अक्षरवेल येथे “चला गणित शिकू या” दहा पुस्तकांच्या संचाचे प्रकाशन
अक्षरवेल येथे “चला गणित शिकू या” दहा पुस्तकांच्या संचाचे प्रकाशन
पुणे (गुरुदत्त वाकदेकर): प्रा. जयंत खेडकर लिखित आणि स्नेहल प्रकाशन, पुणे प्रकाशित “चला गणित शिकू या'' या शालेय विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त दहा पुस्तकांच्या संचाचे विमोचन रविवार, दिनांक 29 मार्च 2026 रोजी अक्षरवेल सभागृहात झाले. महाराष्ट्र टाइम्सच्या पुणे आवृत्तीचे निवासी संपादक मा. श्रीधर लोणी यांच्या हस्ते हा प्रकाशन सोहळा पार पडला.
कार्यक्रमाला ज्येष्ठ प्राध्यापक मोडक सर, डॉ. धनंजय मेहेंदळे, डॉ. विलास बापट, तितिक्षा संस्थेच्या प्रिया दामले, कविराज विजय सातपुते यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. फर्ग्युसन महाविद्यालयातील प्राध्यापक, खेडकर व घाटपांडे परिवारातील आप्तेष्ट, संघ परिवारातील मित्रपरिवार तसेच गणित विषयाचे शिक्षक यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
फर्ग्युसन महाविद्यालयाच्या उपप्राचार्या व डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाच्या सचिव प्रा. स्वाती जोगळेकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. प्रारंभी स्नेहल प्रकाशनचे प्रकाशक रवींद्र घाटपांडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. स्नेहल प्रकाशनाच्या आठशेहून अधिक पुस्तकांच्या परंपरेत शिक्षण क्षेत्रासाठी विशेष उपयुक्त ठरणारी गणित विषयातील ही दहा पुस्तकांची मालिका शिक्षक, विद्यार्थी, गणितप्रेमी पालक आणि जिज्ञासू वाचक यांच्याकडून निश्चितच स्वागतार्ह ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रमुख पाहुणे मा. श्रीधर लोणी यांनी मार्गदर्शन करताना गणित विषय समजून घेतल्यास त्यातील रुक्षता दूर होऊन विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण होते, असे सांगितले. या प्रक्रियेत शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले. या पुस्तकांतील माहिती विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयक संशोधनवृत्ती वाढविण्यास आणि ज्ञानाची व्याप्ती विस्तारण्यास उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन त्यांनी केले.
पुस्तकांचे वाचन करताना जाणवलेल्या काही वैशिष्ट्यपूर्ण बाबींचा उल्लेख करत त्यांनी गणिती संकल्पना समजून घेण्यातील आनंद प्रत्येकाने अनुभवावा, असे सांगितले. कॅलक्युलसमधील लिमिट ही संकल्पना आणि इतर गणिती मुद्यांतील रंजकता त्यांनी प्रभावीपणे उलगडून दाखवली. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात तिच्या मर्यादा ओळखून नैसर्गिक बुद्धिमत्तेचे आणि सर्जनशील व्यक्तिमत्त्व विकासाचे महत्त्व जपणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कादंबरी किंवा गोष्टींच्या पुस्तकांप्रमाणे ही पुस्तके वाचून संपवण्याची नसून, त्यांतील गणित विषयक नवीन माहिती समजून घेण्यासाठी अभ्यासपूर्वक वाचण्याची आहेत, असे मतही श्रीधर लोणी यांनी व्यक्त केले.
अध्यक्षा प्रा. स्वाती जोगळेकर यांनी गणिताकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्याची गरज अधोरेखित केली. गणित विषयाची भीती दूर होऊन त्याविषयी प्रीती निर्माण व्हावी, अशा पद्धतीने अभ्यास झाला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. गणित शिक्षक-शिक्षिका आणि गणितप्रेमी पालक यांची भूमिका या संदर्भात महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येक शाळेत या पुस्तकांचा संच असायलाच हवा, असे त्यांनी आग्रही प्रतिपादन केले.
पुस्तकांचे लेखक प्रा. जयंत खेडकर यांनी प्रत्येक पुस्तकाचे काळजीपूर्वक वाचन आणि अभ्यासपूर्वक परिशीलन शिक्षकवर्ग व गणितप्रेमी जिज्ञासू पालकांनी करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. मित्रप्रेमापोटी रवींद्र घाटपांडे यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आणि चाकोरीबाहेर जाऊन केलेल्या या प्रकाशन उपक्रमाला दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल त्यांनी मनपूर्वक आभार मानले.
उत्कृष्ट मुखपृष्ठासाठी मोहन थत्ते यांचा गौरव करण्यात आला. पुस्तक टायपिंगसाठी धनंजय पुरोहित यांच्या वतीने वंदना साळी यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाम भुर्के यांनी खुसखुशीत शैलीत केले. सामुदायिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade