ग्राहकांची लूट करणाऱ्या 9 कंपन्यांवर दंडात्मक कारवाई
ग्राहकांची लूट करणाऱ्या 9 कंपन्यांवर दंडात्मक कारवाई
मुंबई- : ऑनलाइन खरेदी आणि डिजिटल सेवांमध्ये ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या कंपन्यांविरुद्ध केंद्र सरकारने कठोर कारवाई केली आहे. सेंट्रल कंझ्युमर प्रोटेक्शन ऑथॉरिटी (CCPA)ने ‘डार्क पॅटर्न्स’चा वापर करून ग्राहकांकडून नकळत अतिरिक्त शुल्क आकारणाऱ्या नऊ प्रमुख कंपन्यांवर एकूण २० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. या कारवाईचा उद्देश म्हणजे डिजिटल व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणणे आणि ग्राहकांच्या हक्कांचे रक्षण करणे. तपासादरम्यान कंपन्यांकडून ड्रिप प्राइसिंग, बास्केट स्नीकिंग म्हणजे बिलात परस्पर अतिरिक्त रक्कम जोडणे, तसेच कन्फर्म शेमिंग म्हणजे मानसिक दबाव निर्माण करणारे पर्याय देणे यांसारख्या युक्त्यांचा वापर होत असल्याचे उघड झाले. या पद्धतींमुळे ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे लक्षात घेऊन दंडात्मक कारवाई करण्यात आली.
या प्रकरणात क्विक-कॉमर्स ॲप झेप्टोवर सर्वाधिक ७ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. सुरुवातीला कमी किंमत दाखवून चेकआउटच्या वेळी हँडलिंग आणि मेंबरशिप चार्जेस जोडले जात असल्याचे निष्पन्न झाले. फिजिक्स वालावर ५ लाखांचा दंड ठोठावण्यात आला, कारण ॲपवर ‘PW फाउंडेशन’साठी १० रुपयांची देणगी आधीच निवडलेली असायची आणि ती रद्द करण्याचा प्रयत्न केल्यास भावनिक संदेश दाखवून ग्राहकांना देणगी देण्यास भाग पाडले जात होते.
इंडिगोच्या ॲपवर तिकीट बुक करताना अतिरिक्त सेवा नाकारल्यास ‘नाही, मी जोखीम पत्करेन’ असा संदेश दाखवून प्रवाशांवर मानसिक दबाव आणला जात होता. CCPA च्या हस्तक्षेपानंतर हा संदेश बदलण्यात आला. BookMyShowलाही ‘बुकअस्माईल’ उपक्रमासाठी बिलात परस्पर १ रुपयांची देणगी जोडण्याची पद्धत बंद करण्याचे निर्देश देण्यात आले.
याशिवाय, फर्स्टक्रायवर २ लाख, अनुज जिंदालवर ३ लाख, तर फार्माईझी, मॅकॅफी आणि स्पाइसजेटवर प्रत्येकी १ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
केंद्र सरकारने जून २०२५ मध्येच सर्व ई-कॉमर्स आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्सना डार्क पॅटर्न्स हटवण्याचे निर्देश दिले होते. या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आता थेट दंडात्मक कारवाई होत आहे. या निर्णयामुळे ऑनलाइन खरेदीदार, प्रवासी आणि ॲप वापरकर्त्यांची फसवणूक थांबून डिजिटल व्यवहारांमध्ये पारदर्शकता वाढण्यास मदत होणार आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant