सिंहगड रस्ता परिसरातील रहिवासी आक्रमक : आरएमसी प्लांट त्वरीत बंद करा: ‘कृती समिती’चा आंदोलनाचा इशारा
सिंहगड रस्ता परिसरातील रहिवासी आक्रमक : आरएमसी प्लांट त्वरीत बंद करा: ‘कृती समिती’चा आंदोलनाचा इशारा
पुणे - सिंहगड रस्त्यावरील वडगाव खुर्द, धायरी आणि प्रेयेजा सिटी परिसरातील बेकायदेशीर ‘रेडीमिक्स काँक्रीट’ (आरएमसी) प्लांट त्वरित बंद करून महानगरपालिकेच्या हद्दीबाहेर हलवा, अगोदर हे आरएमसी प्लांट महापलिकेच्या हद्दीबाहेर हलवा त्यानंतर त्यांच्यासाठी नियमावली तयार करा, नागरी वस्त्यांजवळ आरएमसी प्लांट नको अशा विविध मागण्या करत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा ‘सिंहगड रोड आरएमसी प्लांट विरोधी कृती समिती’ने शुक्रवारी पत्रकार परिषदेमध्ये दिला. आंदोलन करूनही दखल न घेतल्यास मुख्यमंत्र्यांचे या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी ते पुणे दौऱ्यावर असताना त्यांचा ताफा अडविण्याशिवाय पर्याय नाही असा इशाराही यावेळी देण्यात आला. खासदार मेधा कुलकर्णी यांनी प्रत्यक्ष पाहणी करून हे प्लांट स्थलांतरित करण्याचे आदेश देउनही त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात आली असा आरोप यावेळी उपस्थित नागरिकांनी केला.
या पत्रकार परिषेदेला राजेंद्र पाटील, गणेश पिंपळे, लोकेश भावेकर, अॅड. प्रीतेश चांडगे, आनंद खळदकर, राहुल मांडे, सुयोग केळकर उपस्थित होते.
वडगाव भागातील आरएमसी प्लांटमुळे धुळीचे साम्राज्य, श्वसनाचे विकार आणि भरधाव वाहनांमुळे होणारे जीवघेणे अपघात यामुळे या भागातील नागरिकांचे जगणे असह्य झाले आहे. दत्तकृष्णाई मंगल कार्यालय ते प्रेयेजा सिटी, मधुकोष सोसायटी आणि परिसरातील अनधिकृत आरएमसी प्लांटमुळे हवेत सिमेंटची भुकटी सतत मिसळत असते. ही भुकटी थेट नागरिकांच्या घरात शिरत असल्याने लहान मुले आणि वृद्धांना श्वसनाचे गंभीर विकार जडले आहेत. सिमेंट वाहून नेणारे डंपर आणि मिक्सरमधून रस्त्यावर सांडणाऱ्या सिमेंटमुळे हवेत प्रदूषणाचे प्रमाण कैक पटीने वाढले आहे, असे यावेळी सांगण्यात आले.
प्रयेजा सिटी, प्रयेजा पुरम, आर्यन रेसिडेन्सी यांसारख्या सोसायट्यांमध्ये हजारो नागरिक राहतात. या भागातील रस्ते मुळातच अरुंद असूनही आरएमसी प्लांटची अवजड वाहने अत्यंत भरधाव वेगाने चालवली जातात. मोबाईलवर बोलत आणि मोठ्या आवाजात गाणी लावून चालणाऱ्या या चालकांमुळे पादचाऱ्यांचा जीव धोक्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच एका मिक्सर वाहनाने एका पादचारी महिलेला चिरडल्याची घटना घडली होती, ज्यात तिचा जागीच मृत्यू झाला.
कारवाई का थांबली?
महापालिकेच्या स्थायी समितीने शहरातील निवासी भागातील आरएमसी प्लांट बाहेर हलवण्याचा ठराव मंजूर केला होता. खासदार मेधा कुलकर्णी यांनीही प्रत्यक्ष पाहणी करून हे प्लांट तातडीने बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, १७ एप्रिल रोजी पहाटे या बेकायदा प्रकल्पांवर कारवाईचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, एका भ्रष्ट अधिकाऱ्याने कारवाईची पूर्वसूचना प्रकल्प चालकांना दिली आणि काही मिनिटांतच ‘वरिष्ठ पातळीवरून’ फोन येऊन ही कारवाई थांबवण्यात आली. या प्रकारामुळे “नागरिकांना कोणी वाली उरला आहे का?” असा संतप्त सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. या भागातील आरएमसी प्लांट हे स्थानिक आमदार आणि लोकप्रतिनिधींचे आहेत. त्यामुळे त्यांना राजकीय पाठबळ मिळत आहे. प्रशासन आणि राजकीय नेते यांचे साटेलोटे असल्यामुळेच या प्लांटवर कारवाई होत नाही. लोहगाव, खांदवेनगर येथील ‘रेडिमिक्स सिमेंट काँक्रिट’ (आरएमसी) प्रकल्पावर, पुणे शहरातील इतर भागातील तसेच पिंपरी चिंचवड भागातील प्लांटवर कारवाई केली जाते मग सिंहगड भागातील प्लांटवर कारवाई का केली जात नाही? एकाला एक न्याय तर दुसऱ्याला दुसरा न्याय का? असे प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आले.
प्रमुख मागण्या
१) स्थायी समितीच्या ठरावानुसार वडगाव भागातील आरएमसी प्लांट तात्काळ शहराबाहेर हलवावेत आणि त्यानंतरच आरएमसी प्लांटसाठीची नियमावली तयार करावी. आहे त्या जागेवर कुठल्याही परिस्थितीत परवानगी नको.
२) कारवाईची माहिती प्रकल्प चालकांना देणाऱ्या ‘त्या’ भ्रष्ट अधिकाऱ्याची सखोल चौकशी करून निलंबन करावे.
३) वरिष्ठ पातळीवरून कारवाई थांबवण्याचे आदेश देणाऱ्या सूत्रांचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant