नांदूरमध्यमेश्वरमध्ये ‘ग्रेट व्हाईट पेलिकन’चे आगमन
नांदूरमध्यमेश्वरमध्ये ‘ग्रेट व्हाईट पेलिकन’चे आगमन
नाशिक -नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील नांदूर मध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्य येथे प्रथमच ‘ग्रेट व्हाईट पेलिकन’ (रोजी पेलिकन) या दुर्मिळ पक्ष्यांचे आगमन झाल्याने निसर्गप्रेमी आणि पक्षी अभ्यासकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. २८ मार्च २०२६ रोजी या पक्ष्याची अधिकृत नोंद करण्यात आली असून, महाराष्ट्रासाठी ही एक ऐतिहासिक घटना मानली जात आहे.
अभयारण्याच्या नोंदींनुसार, यापूर्वी या प्रजातीचे दर्शन येथे झाले नव्हते. तसेच राज्यातही हा पक्षी अत्यंत दुर्मीळ मानला जातो. स्थलांतराच्या परतीच्या प्रवासादरम्यान (Return Migration) या पक्ष्यांनी नांदूर मध्यमेश्वरची निवड केल्याने येथील परिसंस्थेच्या आरोग्याचे हे सकारात्मक लक्षण असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
‘रोजी पेलिकन’ हे नाव का?
‘ग्रेट व्हाईट पेलिकन’ या पक्ष्याच्या पांढऱ्या शुभ्र पिसांवर विणीच्या हंगामात किंवा विशिष्ट प्रकाशात हलकी गुलाबी छटा दिसून येते. यामुळेच त्यांना ‘रोजी पेलिकन’ असेही संबोधले जाते. हे पक्षी हिवाळ्याच्या सुरुवातीला उत्तर गोलार्धातून दक्षिणेकडे स्थलांतर करतात आणि मार्च महिन्याच्या अखेरीस पुन्हा युरोप व मध्य आशियातील त्यांच्या मूळ अधिवासाकडे परतू लागतात. या दीर्घ प्रवासात विश्रांती आणि अन्नसाठ्यासाठी त्यांनी नांदूर मध्यमेश्वरचा आश्रय घेतल्याचे दिसून येते.
वैशिष्ट्ये आणि महत्त्व
पेलिकन हे जगातील सर्वात मोठ्या उडणाऱ्या पक्ष्यांपैकी एक असून त्यांचा पंखांचा विस्तार प्रचंड असतो. त्यामुळे ते लांब पल्ल्याचे स्थलांतर सहज पार करू शकतात. उपवनसंरक्षक (वन्यजीव) कृष्णा भवर यांनी सांगितले की, जलाशयातील माशांची मुबलक उपलब्धता तसेच पानवेली आणि टायफा यांचे उच्चाटन करून तयार करण्यात आलेला योग्य अधिवास हे या पक्ष्यांच्या आगमनामागील मुख्य कारण आहे.
सहाय्यक वनसंरक्षक हेमंत उबाळे यांनी म्हटले की, “अधिवासाचे संवर्धन आणि योग्य व्यवस्थापन केल्यास दुर्मिळ पक्ष्यांनाही आकर्षित करता येते, याचे हे उत्तम उदाहरण आहे.” वनपरिक्षेत्र अधिकारी हिरालाल चौधरी यांनी या घटनेला अभयारण्यासाठी ऐतिहासिक क्षण संबोधत, “या पाहुण्या पक्ष्यांचे आम्ही मनापासून स्वागत करतो,” असे सांगितले. दरम्यान, या दुर्मिळ पक्ष्यांच्या आगमनामुळे नांदूर मध्यमेश्वर अभयारण्य पुन्हा एकदा पक्षीप्रेमींसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant