*इशान किशनची झंझावाती खेळी; भारताचा पाकिस्तानवर ६१ धावांनी दणदणीत विजय*
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी–२० विश्वचषक २०२६ मधील २७ व्या सामन्यात गट अ मध्ये भारताने पाकिस्तानवर ६१ धावांनी दणदणीत विजय मिळवत स्पर्धेतील आपली दावेदारी अधिक मजबूत केली. आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ७ गडी गमावून १७५ धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा डाव १८ षटकांत ११४ धावांत संपुष्टात आला.
नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या भारताला सुरुवातीला धक्का बसला. अभिषेक शर्मा पहिल्याच षटकात बाद झाला. मात्र, त्यानंतर इशान किशनने एकाकी झुंजार खेळी करत भारतीय डावाला आकार दिला. त्याने ४० चेंडूंमध्ये १० चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ७७ धावांची स्फोटक खेळी साकारली. तिलक वर्माने २५, सूर्यकुमार यादवने ३२ आणि शिवम दुबेने २७ धावांची उपयुक्त भर घातली. अखेरीस रिंकू सिंहने अवघ्या ४ चेंडूंमध्ये नाबाद ११ धावा करत भारताला १७५ धावांपर्यंत पोहोचवले.
१७६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव सुरुवातीपासूनच ढासळला. जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्याच्या अचूक माऱ्याने अवघ्या २ षटकांत पाकिस्तानची ३ गडी बाद झाली. बाबर आझम ५ धावांवर तंबूत परतला. उस्मान खानने ४४ धावांची झुंजार खेळी केली, मात्र दुसऱ्या टोकाला त्याला पुरेशी साथ मिळाली नाही. अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव यांनी मधल्या षटकांत अचूक गोलंदाजी करत पाकिस्तानचा डाव गुंडाळला.
या सामन्यात अनेक महत्त्वाचे विक्रम नोंदले गेले. इशान किशनने विश्वचषकातील भारताकडून पाकिस्तानविरुद्ध सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या करण्याचा विक्रम नोंदवला. त्याच्या ७७ धावा या या स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामन्यातील सर्वोच्च खेळी ठरली. भारताने पाकिस्तानला ६१ धावांनी पराभूत करून टी–२० विश्वचषकातील या दोन्ही संघांमधील सर्वात मोठ्या विजयाचा नवा विक्रम केला. तसेच, जसप्रीत बुमराहने या सामन्यात दोन बळी घेत आंतरराष्ट्रीय टी–२० कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा ओलांडला.
या विजयासह भारताने गुणतालिकेत अव्वल स्थान अधिक भक्कम केले असून उपांत्य फेरीकडे मोठे पाऊल टाकले आहे. पाकिस्तानसाठी मात्र हा पराभव चिंताजनक ठरला असून पुढील सामने जिंकण्याचे आव्हान अधिक कठीण बनले आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर