लोकार्पणानंतर मुंबई मेट्रो लाईन 2B वर पहिल्यांदाच व्यावसायिक चित्रीकरण
लोकार्पणानंतर मुंबई मेट्रो लाईन 2B वर पहिल्यांदाच व्यावसायिक चित्रीकरण
मुंबई -: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) आर्थिक शाश्वतता आणि पायाभूत सुविधांच्या बहुउद्देशीय वापराच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, मुंबई मेट्रो लाईन 2B वर पहिल्यांदाच व्यावसायिक जाहिरात चित्रीकरण यशस्वीरीत्या पार पाडले आहे. मुंबईच्या मेट्रो व्यवस्थेच्या उत्क्रांतीतील हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
मंडाले मेट्रो स्थानक तसेच कार्यरत मेट्रो रेल्वेगाडीत हे चित्रीकरण करण्यात आले. एमएमएमओसीएलच्या ‘प्रिमायसेस हायरिंग पॉलिसी फॉर इव्हेंट्स’ (चित्रपट व जाहिरात चित्रीकरणासह) अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला. यामुळे मेट्रो पायाभूत सुविधा केवळ प्रवासी वाहतुकीपुरती मर्यादित न राहता, बहुआयामी नागरी मालमत्ता म्हणून वापरण्याच्या धोरणात्मक दृष्टिकोनाला अधोरेखित करण्यात आले आहे. या उपक्रमातून ₹२०.३५ लाख (जीएसटीसह) इतका महसूल प्राप्त झाला असून, एमएमआरडीएच्या नॉन-फेअर बॉक्स महसूल (NFBR) वाढविण्याच्या प्रयत्नांना यामुळे ठोस बळ मिळाले आहे.
भाडेआधारित उत्पन्नावरील अवलंबित्व टप्प्याटप्प्याने कमी करत आर्थिक स्थैर्य साध्य करण्याच्या दीर्घकालीन धोरणातील हा एक महत्त्वाचा घटक मानला जातो. मेट्रो स्थानके आणि रेल्वेगाड्यांमध्ये चित्रीकरणासाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या माध्यमातून महसूलात सातत्याने वाढ होत असल्याचेही दिसून येते:
- आर्थिक वर्ष २०२४–२५ : ₹२०.४१ लाख
- आर्थिक वर्ष २०२५–२६ : ₹२५.९६ लाख
- आर्थिक वर्ष २०२६–२७ (चालू) : ₹२०.३५ लाख
नॉन-फेअर बॉक्स महसुलाचे प्रमुख स्रोत पुढीलप्रमाणे आहेत:
- दूरसंचार सेवा
- मेट्रो स्थानकांवरील व रेल्वेगाड्यांवरील जाहिराती
- इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग सुविधा
- स्थानकांवरील किऑस्क्स
- व्यावसायिक चित्रपट/जाहिरात चित्रीकरण
- स्थानक नामकरण व ब्रँडिंग हक्क
मागील वर्षात नॉन-फेअर बॉक्स महसुलातून सुमारे ₹८१ कोटी उत्पन्न झाले असून, मुंबईच्या विस्तारत असलेल्या मेट्रो नेटवर्कच्या व्यावसायिक क्षमतेचे हे ठोस निदर्शक आहे. महसूल निर्मितीपलीकडे, या उपक्रमामुळे मेट्रो व्यवस्था एक सशक्त ‘अर्बन मीडिया आणि क्रिएटिव्ह प्लॅटफॉर्म’ म्हणूनही समोर येत आहे. आधुनिक वास्तुरचना, उच्च स्वच्छता मानके आणि कार्यक्षम सेवा यामुळे मुंबई मेट्रो ही चित्रपट, जाहिराती आणि डिजिटल कंटेंट निर्मितीसाठी आकर्षक ठिकाण म्हणून उदयास येत आहे.
महा मुंबई मेट्रोने निर्माते, चित्रपट दिग्दर्शक आणि कंटेंट निर्मात्यांना मेट्रोच्या जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांचा वापर करण्यासाठी खुले आमंत्रण दिले आहे. सुस्पष्ट धोरणे आणि सुलभ मंजुरी प्रक्रिया यामुळे अशा उपक्रमांची अंमलबजावणी जलद आणि सुसंगतपणे होणार असून, प्रवासी सेवांवर कोणताही परिणाम होणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. हा उपक्रम एमएमआरडीएच्या भविष्याभिमुख, आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि बहुउद्देशीय मेट्रो व्यवस्थेच्या दृष्टीकोनाला अधोरेखित करतो—जिथे पायाभूत सुविधा केवळ प्रवास सुलभ करत नाहीत, तर नवोन्मेषी महसूल स्रोतांद्वारे मूल्यनिर्मिती करत ‘अधिक सक्षम आणि एकात्मिक मुंबई महानगर प्रदेशा’च्या उभारणीला चालना देतात.
डॉ. संजय मुखर्जी, महानगर आयुक्त, एमएमआरडीए तथा अध्यक्ष, महा मुंबई मेट्रो, म्हणाले:
“मेट्रो पायाभूत सुविधांकडे आम्ही बहुआयामी नागरी मालमत्ता म्हणून पाहत आहोत. प्रवासी तिकीटाव्यतिरिक्त मिळणारा महसूल वाढविणाऱ्या अशा उपक्रमांद्वारे आम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम प्रणाली उभारत आहोत, जी परवडणारी वाहतूक सेवा देतानाच अधिक समृद्ध आणि एकात्मिक प्रवासी अनुभवही प्रदान करण्यासाठी उपकारक करेल.”
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर