नगरसेवकांचा संताप, ‘एस’ विभागात कामांचा बोजवारा, पालिका प्रशासनावर ताशेरे
नगरसेवकांचा संताप, ‘एस’ विभागात कामांचा बोजवारा, पालिका प्रशासनावर ताशेरे
मुंबई-– भांडुप परिसरातील नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत पालिकेच्या ‘एस’ विभागातील नगरसेवकांनी आज सहाय्यक आयुक्तांच्या बैठकीत तीव्र संताप व्यक्त केला. रखडलेली कामे, गॅस जोडणीचा ठप्प कारभार आणि पावसाळ्यापूर्वीची अपुरी तयारी यामुळे प्रशासनाच्या निष्क्रियतेवर जोरदार टीका करण्यात आली.
ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांच्या सूचनेनुसार आयोजित या बैठकीत सहाय्यक आयुक्त समरीन सय्यद, विभागप्रमुख रमेश कोरगावकर, नगरसेविका दिपमाला बढे, राजोल संजय पाटील, ज्योती राजभोज, सुरेश शिंदे तसेच संबंधित अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. मात्र बैठकीत प्रशासनाच्या कामकाजावर समाधान व्यक्त होण्याऐवजी तीव्र नाराजीचाच सूर उमटला. भांडुप परिसरातील नव्याने उभारलेल्या अनेक इमारतींना अद्याप महानगर गॅस पाईपलाईनची जोडणी मिळालेली नाही. वारंवार पाठपुरावा करूनही संबंधित यंत्रणा ढिम्म असल्याचा आरोप करण्यात आला. नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यात प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरल्याचे नगरसेवकांनी स्पष्टपणे सांगितले.
नालेसफाई, गटारे दुरुस्ती आणि इतर अत्यावश्यक कामे अद्याप सुरूही झाली नसल्याने येणाऱ्या पावसाळ्यात परिस्थिती गंभीर होण्याची भीती व्यक्त करण्यात आली. अनेक ठिकाणी कामे अर्धवट अवस्थेत असून त्याकडे प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला. भांडुपमध्ये मोठ्या प्रमाणावर उंच इमारती उभ्या राहत असताना शिवरेज लाईनच उपलब्ध नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विकासाच्या नावाखाली केवळ इमारती उभारल्या जात आहेत, मात्र मूलभूत सुविधा देण्याबाबत प्रशासन उदासीन असल्याचा संताप व्यक्त करण्यात आला.
महानगर गॅस जोडणीचे काम संथ गतीने सुरू असून प्रशासन आणि संबंधित कंपन्यांमध्ये समन्वयाचा अभाव स्पष्ट दिसत असल्याची टीका करण्यात आली. नागरिकांना सुविधा देण्याऐवजी त्यांना त्रास सहन करायला लावणारे हे धोरण असल्याचे नगरसेवकांनी स्पष्ट केले. बैठकी दरम्यान सहाय्यक आयुक्त समरीन सय्यद यांनी सर्व प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे आणि गॅस जोडणी प्रक्रियेला गती देण्याचे आश्वासन दिले. मात्र, अशा आश्वासनांचा पाऊस दरवेळी पडतो, पण प्रत्यक्षात कामे होत नाहीत, असा आरोप करत नगरसेवकांनी प्रशासनाला इशाराही दिला.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर