कुंभमेळा नियोजनात सहभाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक श्रेयांक
कुंभमेळा नियोजनात सहभाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक श्रेयांक
पुणे - ऑक्टोबर 2026 ते जुलै 2028 दरम्यान नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. लाखोंची उपस्थिती असणाऱ्या या सोहळ्यात प्रशासनाला विविध सेवांमध्ये मदत करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता दोन शैक्षणिक श्रेयांक (Credits) प्रदान करण्यात येणार आहेत. प्रामुख्याने नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय लागू असून, येत्या काही दिवसांत या प्रक्रियेला अधिकृत आणि अंतिम स्वरूप दिले जाणार आहे.
विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य सागर वैद्य यांनी या संदर्भातील प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावाचे गांभीर्य लक्षात घेऊन कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी आणि प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांच्यासह व्यवस्थापन परिषद व विद्या परिषदेने याला तत्त्वतः मान्यता दिली आहे. यापूर्वीच्या कुंभमेळ्यांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांनी केवळ स्वयंसेवक म्हणून काम केले होते; परंतु आता त्यांच्या या श्रमाचे चीज व्हावे, या उद्देशाने त्यांना ‘ओपन इलेक्टिव्ह क्रेडिट’ अंतर्गत श्रेयांक देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे.
डॉ. पराग काळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांना हे दोन श्रेयांक मिळवण्यासाठी कुंभमेळ्याच्या नियोजित कामांमध्ये किमान ६० तास योगदान देणे अनिवार्य असेल. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार आणि क्षमतेनुसार कामाचे स्वरूप निवडता येईल. काम पूर्ण केल्यानंतर विद्यापीठाचे श्रेयांक मिळण्यासोबतच प्रशासनाकडून त्यांना अधिकृत प्रमाणपत्रही प्रदान केले जाईल. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना व्यवस्थापकीय कौशल्यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळेल आणि हा त्यांच्या शैक्षणिक कारकीर्दीतील एक ‘अनोखा शैक्षणिक उपक्रम’ ठरेल.
नाशिक कुंभमेळ्यासाठी जगभरातून कोट्यवधी भाविक येण्याची शक्यता आहे. अशा वेळी प्रशासनावर प्रचंड ताण असतो. ही बाब लक्षात घेऊन वाहतूक नियंत्रण, आरोग्य सेवा, आपत्ती व्यवस्थापन, गर्दीचे नियंत्रण, सीसीटीव्ही सर्वेक्षण, पर्यावरण संवर्धन आणि संशोधनात्मक कार्य अशा विविध क्षेत्रांत विद्यार्थी आपले योगदान देऊ शकतात. विद्यार्थ्यांच्या या सक्रिय सहभागामुळे प्रशासनाला हक्काचे आणि सुशिक्षित सहायक मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर