अभिनय आाणि संगीत कलेत आवाजाचे महत्त्व ओळखणे गरजेचे : पद्मश्री प्रा. वामन केंद्रे
अभिनय आाणि संगीत कलेत आवाजाचे महत्त्व ओळखणे गरजेचे : पद्मश्री प्रा. वामन केंद्रे
मुंबई - आवाज ही मानवाला दिलेली देणगी आहे. आवाज आणि ध्वनी यातील फरक संगीत शिक्षकांना ओळखता आला पाहिजे. संगीत शिकविताना तसेच अर्थपूर्ण संवाद साधताना आवाजातील चढ उतारांमधील समतोल साधणेही तितकेच गरजेचे आहे. आवाजातील सकारात्मकता ओळखता आली की, संभाषण हृदयापर्यंत सहज भिडते, अशा शब्दात प्रसिद्ध नाटककार, दिग्दर्शक, पद्मश्री प्रा. वामन केंद्रे यांनी संवादाचे महत्त्व पटवून दिले.
बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या संगीत व कला अकादमी (संगीत विभाग) यांच्या वतीने आयोजित नाट्यविषयक प्रात्यक्षिक व्याख्यानात पद्मश्री प्रा. वामन केंद्रे बोलत होते. शिक्षण विभागाच्या करी रोड येथील कार्यालयात मंगळवारी (दिनांक १० मार्च २०२६) व्याख्यान पार पडले. या व्याख्यानात श्री. केंद्रे यांनी काही संगीत शिक्षकांना आवाज आणि चेहऱ्यावरील हावभाव याबाबत प्रात्यक्षिक करायला सांगितले. त्यातून त्यांनी उपस्थित संगीत शिक्षकांना संवाद कौशल्य आणि देहबोली यांचा योग्य समन्वय कसा साधायचा याबाबत सखोल मार्गदर्शन केले.
या व्याख्यानाला संगीत अकादमीच्या सल्लागार समिती सदस्य श्रीमती श्रुती सडोलीकर-काटकर, संगीत अकादमीच्या प्राचार्य श्रीमती शिवांगी दामले आदींसह शिक्षण विभागाती संगीत शिक्षक, शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) चे माजी संचालक प्रा. केंद्रे यांनी आपल्या ओघवत्या शैलीत अभिनय आणि संगीत कलेतील आवाजाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, आवाज हा केवळ ध्वनी नसून ती सजीव व्यक्तिमत्त्वाची ओळख आहे. आवाजातील सकारात्मकता ओळखता आली पाहिजे. हे करीत असताना प्रत्येकाने दिवसाची सुरुवात सकारात्मक संवादाने केली तर दिवसभरातील सगळी कामे करताना सकारात्मक उर्जा आपल्यात संचारते. याउलट नकारात्मक संवादाने माणसांशी असलेले नाते तुटते. दैनंदिन काम करताना अनेकदा ताणतणाव येतात. मात्र सकारात्मक संवाद साधण्याचे कौशल्य जर तुमच्याकडे असेल तर ताणतणावालाही तुम्ही सहज सामोरे जावू शकतात, अशा शब्दात श्री. केंद्रे यांनी उपस्थित संगीत शिक्षकांशी हसतखेळत संवाद साधला.
आवाज आणि संवादाचे महत्त्व पटवून देताना श्री. केंद्रे यांनी संगीत शिक्षकांकडून काही प्रात्यक्षिकही करून घेतली. या प्रत्येक प्रात्यक्षिकातून त्यांनी स्वरांमधील चढ-उतार, आवाजातील माधुर्य, चेहऱ्यांवरील हावभाव या सगळ्यांचा आपल्या दैनंदिन जगण्याशी कसा संबंध जोडला गेला आहे, हे देखील पटवून दिले.
प्रत्येकाने स्वतःच्या आवाजातील वैशिष्ट्ये ओळखून त्यावर काम करणे आवश्यक असल्याचे सांगताना केंद्रे यांनी सकारात्मक विचारसरणी आणि सातत्यपूर्ण सराव यांवर भर दिला. संवाद करताना चेहऱ्यावर स्मित ठेवणे, सकारात्मक देहबोली वापरणे तसेच शब्दांची स्पष्ट मांडणी करणे यामुळे संवाद अधिक प्रभावी होतो, असेही त्यांनी मार्गदर्शन केले. अभिनय आणि संगीत कलेत प्रभावी सादरीकरणासाठी आवाजाचा योग्य वापर आणि सातत्यपूर्ण सराव अत्यंत महत्त्वाचा असल्याचे केंद्रे यांनी स्पष्ट केले.
या कार्यशाळेत त्यांनी उपस्थित शिक्षकांना व्यासपिठावर बोलावून त्यांना आवाजातील आरोह, अवरोह कसा नियंत्रणात ठेवावा, त्यातील बारकावे, शब्दोच्चार आणि त्यासोबतच आपल्या चेहऱ्यावरील हावभावांकडे लक्ष देत आवाजातील गोडवा कसा जपावा यावरही श्री. केंद्रे यांनी खेळीमेळीच्या वातावरणात मार्गदर्शन केले. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व संगीत व कला विद्यालयांचे शिक्षक यावेळी उपस्थित होते. उपस्थित संगीत शिक्षण आपल्या विद्यार्थ्यांनाही या कार्यशाळेबाबत माहिती देणार आहेत.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर