‘मुंबई क्लीन लीग’ स्पर्धेसाठी मुंबईकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद
‘मुंबई क्लीन लीग’ स्पर्धेसाठी मुंबईकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबई - बृहन्मुंबई क्षेत्रात स्वच्छता सुनिश्चित करणे आणि नागरिकांचा सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून ‘मुंबई क्लीन लीग’ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेला मुंबईकर नागरिक आणि विविध आस्थापनांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत यात १,०९६ हून अधिक आस्थापनांनी सहभाग नोंदवला आहे. तर, स्पर्धेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू असून नागरिकांनी यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून बृहन्मुंबई क्षेत्रात सार्वजनिक स्वच्छतेच्या दृष्टीने निरनिराळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच, याबाबत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर, मुंबईत दीर्घकालीन स्वच्छता सुनिश्चित करण्यासाठी ‘मुंबई क्लीन लीग’ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. प्रसिद्ध अभिनेते, पद्मश्री श्री. अक्षय कुमार यांच्या उपस्थितीत दिनांक १७ मार्च २०२६ रोजी या स्पर्धेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली. नागरिक किंवा आस्थापनांना https://sba.mcgm.gov.in/bmc/ या लिंकवर जाऊन किंवा समाजमाध्यम, प्रसारमाध्यमे, जनजागृती फलकांद्वारे प्रसारित करण्यात आलेले क्यूआर कोड स्कॅन करुन स्पर्धेसाठी नोंदणी करता येईल. निकोप आणि पारदर्शकपणे स्पर्धा होण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक नोंदणीकृत आस्थापनांचे मूल्यमापन संकेतस्थळावर वास्तविक वेळेत (रिअल टाइम) पाहता येणार आहे.
या स्पर्धेसाठी दिनांक ३० मार्च २०२६ पर्यंत एकूण १ हजार ०९६ नोंदणी झाल्या आहेत. यामध्ये ९५२ नागरिक, १० वाणिज्यिक आस्थापना, ४१ शाळा, ७ रुग्णालये, ११ उपाहारगृहे, ६६ निवासी संकुले, ९ हॉटेल्स आदींचा समावेश आहे.
स्वच्छ प्रशासकीय विभाग (नगरसेवक गट), स्वच्छ प्रशासकीय विभाग (वॉर्ड), स्वच्छ निवासी संकुल, स्वच्छ झोपडपट्टी परिसर, स्वच्छ वाणिज्यिक आस्थापना, स्वच्छ रुग्णालय (शासकीय व खासगी), स्वच्छ उपाहारगृह (रेस्टॉरंट), स्वच्छ सामुदायिक शौचालय, स्वच्छ रस्ते/मार्ग, स्वच्छ उद्यान आणि मोकळ्या जागा, स्वच्छ बाजार परिसर तसेच आसपासचा परिसर स्वच्छतेसाठी दत्तक घेणे या विविध गटांमध्ये ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. यासाठी गटनिहाय लाखो रुपयांची पारितोषिके निश्चित करण्यात आली आहेत. त्यामुळे, या विविध गटांनुसार, नागरिक किंवा आस्थापनांनी स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर