पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान (FLN) उपक्रमाचा प्रशासनाकडून आढावा
पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान (FLN) उपक्रमाचा प्रशासनाकडून आढावा
मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागातर्फे महानगरपालिकेच्या सर्व माध्यमाच्या सर्व शाळांमधील इयत्ता १ ली ते ४ थीच्या सुमारे १ लाख २० हजार विद्यार्थ्यांसाठी पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान ( Foundational Literacy and Numeracy) हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या विद्यार्थ्यांमधील शैक्षणिक प्रगतीची आढावा बैठक बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील पेंग्विन सभागृहात आज (दिनांक २५ मार्च २०२६) पार पडली. मुक्तांगण एज्युकेशन ट्रस्ट, अदानी फाऊंडेशन व स्टरलाईट एअरइंडिया फाउंडेशनचे या उपक्रमाला सहाय्य मिळाले.
शिक्षण समिती अध्यक्ष श्रीमती राजेश्री शिरवडकर, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव श्री. रणजीतसिंह देओल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, उप आयुक्त (शिक्षण) डॉ. (श्रीमती) प्राची जांभेकर, राज्याचे शिक्षण उप संचालक श्री. राजेश कंकाळ, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्रीमती सुजाता खरे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री. किर्तीवर्धन किरतकुडवे आदी उपस्थित होते.
भारताच्या शिक्षण मंत्रालयाने सुरू केलेल्या निपुण भारत अभियान (Nipun Bharat Mission) अंतर्गत सन २०२७ मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक क्षमता तपासण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत प्रथम जानेवारी २०२५ मध्ये इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांमध्ये हा प्रयोग करण्यात आला. ही मुले आधी अडखळत वाचत होती. मात्र कालांतराने त्यांचे वाचन सुधारले. अक्षर ओळखही वाढली. आता हा उपक्रम अधिक व्यापक स्वरुपात राबविण्यात येत आहे. आता इयत्ती पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी जून २०२५ पासून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यामुळे या वर्गातील मुलांचे संख्याज्ञान, अक्षरओळख, भाषाज्ञान वाढले आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष देण्यात येत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची प्रगती पाहता लवकरच हा उपक्रम महाराष्ट्रभर राबविण्यावरही आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.
शिक्षण समिती अध्यक्ष श्रीमती राजेश्री शिरवडकर म्हणाल्या, बृहन्मुंबई महानगरपालिकेचा शिक्षण विभाग सतत विद्यार्थ्यांसाठी नवनवीन उपक्रम हाती घेत असतो. पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान हा खूप पुरोगामी उपक्रम आहे. या विद्यार्थ्यांचा पाया पक्का झाला तर त्यांना भविष्यात नक्कीच याचा फायदा होईल.
प्रधान सचिव श्री. रणजीतसिंह देओल म्हणाले, मुंबईत पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञानाची (FLN) अधिक गरज आहे. या उपक्रमाचा प्रसार करण्यासाठी अधिक मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्याची गरज आहे. केवळ एका वर्षात पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञानाचे ध्येय साध्य होणार नाही. यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज आहे. मुंबईमध्ये विविध भाषा बोलणारी मुले आहेत. महानगरपालिकेच्या अनेक माध्यमांच्या शाळांमध्ये मुले शिकतात. सर्वांना मराठी किंवा इतर भाषा येताताच असे नाही. बृहन्मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेला हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. यामुळे मुलांची शैक्षणिक प्रगती होण्यास नक्कीच मदत होणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे म्हणाले, शिक्षक हा शाळेचा आत्मा असतो. शिक्षकावर शाळेची प्रगती अवलंबून असते. आजही मला माझ्या मराठी शाळेतील शिक्षकांची नावे आणि चेहरे आठवतात. लहान वयात जे संस्कार होतात, ते आयुष्यभर टिकतात. पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये बदल पाहायला मिळत आहे. विद्यार्थ्यांचा पाया भक्कम होण्यासाठी असे उपक्रम खूप महत्त्वाचे आहेत.
पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान उपक्रमाचा संपूर्ण अहवाल आणि शैक्षणिक माहिती उप आयुक्त (शिक्षण) डॉ. जांभेकर यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे दिली. यामध्ये प्रश्नावली, विद्यार्थ्यांनी दिलेली उत्तरे, तसेच अभ्यासक्रमाचा आढावा घेतला. यासोबत या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख कसा उंचावत आहे, याबाबतही सविस्तर माहिती त्यांनी दिली.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade