रौप्यमहोत्सवी कविसंमेलनात आरती प्रभू यांच्या काव्याचा सुरेल उत्सव
रौप्यमहोत्सवी कविसंमेलनात आरती प्रभू यांच्या काव्याचा सुरेल उत्सव
मंजिरी मराठे यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला लाभली रुपेरी झळाळी
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : “कविता ही केवळ शब्दांची मांडणी नसून ती हृदयाची भाषा आणि समाजाचे प्रतिबिंब असते. कवीच्या संवेदनशीलतेतून जीवनाचे अनेक पैलू उलगडत जातात,” असे प्रेरणादायी विचार कविसंमेलन अध्यक्ष मंजिरी श्रीनिवास मराठे यांनी व्यक्त केले. मराठी साहित्य व कला सेवा यांच्या वतीने आयोजित रौप्यमहोत्सवी कविसंमेलनाच्या निमित्ताने त्या बोलत होत्या. हे कविसंमेलन रविवार, दिनांक ८ मार्च २०२६ रोजी दादर (पूर्व) येथील हिंदू कॉलनीतील इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या राजा शिवाजी विद्यालयाच्या सभागृहात उत्साहपूर्ण आणि साहित्यनिष्ठ वातावरणात पार पडले. मराठी काव्यपरंपरेचा समृद्ध वारसा जपत कवी–रसिक संवाद अधिक व्यापक व्हावा, या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संमेलनात शब्द, भावना आणि विचारांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.
सायंकाळी ४.३० वाजता कार्यक्रमास सुरुवात झाली. मुक्त विषयांवरील काव्यसादरीकरणाबरोबरच आरती प्रभू यांच्या साहित्यकृतींचे अभिवाचन विशेष आकर्षण ठरले. चिंतामणी त्र्यंबक खानोलकर उर्फ आरती प्रभू यांच्या संवेदनशील आणि अंतर्मुख काव्यविश्वाचे प्रभावी अभिवाचन रसिकांच्या मनाला स्पर्शून गेले. या प्रसंगी महेश भिकाजी बंडबे लिखित ‘मयावळी’ या चारोळी संग्रहाचे प्रकाशन मंजिरी मराठे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या संग्रहाच्या प्रती उपस्थितांनी उत्साहाने विकत घेतल्या. नवोदित साहित्यिकांच्या पाठी मराठी साहित्य व कला सेवा परिवार खंबीरपणे उभा असल्याचे यामुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
सदर कविसंमेलनात कल्पना उबाळे, अशोक दशरथ भवार, कृपा राकेश म्हात्रे, ज्योती राखुंडे, प्रफुल अनंत साने, महेश भिकाजी बंडबे, प्रांजली गुरुप्रसाद भट्टगावकर, मोहित जनार्दन तांडेल, डॉ. मानसी पाटील, विक्रांत मारुती लाळे, वनिता सचिन साळुंखे, विवेक वसंत जोशी, वैभवी विनीत गावडे, सानिका आनंदराव येडगे, सीमा खान-शेख, सुनिता पांडुरंग अनभुले, स्मिता शाम तोरसकर, धनंजय पांडुरंग पाटील, समिधा विकास नलावडे आणि गुरुदत्त दिनकर वाकदेकर यांनी आपल्या स्वरचित कवितांचे सादरीकरण केले. त्यांच्या कवितांना रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळाली. तर अभिवाचन सत्रात चंद्रकांत दढेकर आणि नमिता नितीन आफळे यांच्या प्रभावी अभिवाचनामुळे कार्यक्रमाला वेगळीच रंगत आली.
कवितांच्या आस्वादासाठी राकेश म्हात्रे, समीर करंगुटकर, वनिता अशोक भवार, अर्चना देशपांडे जोशी, मनिषा कदम, गुरुप्रसाद भट्टगावकर, अनुज केसरकर आणि संदेश लोखंडे उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा वाढली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नमिता नितीन आफळे यांनी संयत आणि प्रभावी शैलीत केले. त्यांनी आणलेल्या चाफ्याच्या फुलांचा दरवळ त्यांच्या शब्दांनाही लाभला. अल्पोपहाराची व्यवस्था महेश बंडबे, मोहित तांडेल आणि अनुज केसरकर यांनी सांभाळली. कार्यक्रमात सहभागी कवी व अभिवाचकांना देवेंद्र वनिता सचिन साळुंखे यांच्या वतीने सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.
समारोपप्रसंगी संस्थापक व अध्यक्ष गुरुदत्त दिनकर वाकदेकर यांनी उपस्थित कवी, अभिवाचक, आस्वादक आणि रसिकांचे आभार मानले. हे कविसंमेलन केवळ काव्यसादरीकरणाचा कार्यक्रम न राहता संवेदनशील मनांचा साहित्यिक मेळावा ठरल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. पुढील कविसंमेलन रविवार, दिनांक ५ एप्रिल २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. या कार्यक्रमाला रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर