लाडकी बहीण योजना वादाच्या भोवऱ्यात
लाडकी बहीण योजना वादाच्या भोवऱ्यात
आमदार रवी राणा यांनी नुकतेच अमरावतीत एका कार्यक्रमात आक्षेपार्ह विधान केले आहे. त्यांच्या या विधानावर आरोप - प्रत्यारोप सुरू झाले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत मला मतरुपी आशीर्वाद न दिल्यास, लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपये खात्यातून काढून घेईन, असे विधान आमदार रवी राणा यांनी केले आहे. त्यांच्या या विधानानंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या विधानावर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी संताप व्यक्त केल्यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही रवी राणांवर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, अशा वक्तव्यांमुळे सरकारची बदनामी होत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
अजित पवार यांनी रवी राणांच्या विधानाचा समाचार घेताना म्हटले आहे की, कोणत्यातरी लोकप्रतिनिधीने सांगितले की हे १५०० रुपये परत घेणार. मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीने सांगतो की हे पैसे परत घेण्याकरता नाहीत, तुमच्याकरता दिलेले आहेत. काहीजण कधीतरी वेगळ्या पद्धतीने वक्तव्य करतात, मग त्यातून पेपरबाजी केली जाते. बातम्या होतात. त्यातून नाहक महायुतीच्या सरकारची बदनामी होते. लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेऊ म्हणणाऱ्या रवी राणांचे नाव न घेता त्यांच्या वक्तव्यावर राज्याचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुनावले आहे की,अरे वेड्यांनो, निवडणुकीत मतरुपी आशीर्वाद न दिल्यास, लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढून घेईन असे म्हणता पण बहिणीला दिली गेलेली भाऊबीज परत घेता येत नाही. राणांच्या विधानावरून विरोधकांकडून त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. जळगावात लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्यावर रवी राणांना न बोलता विरोधकांना लक्ष्य केले आहे. ते म्हणाले, लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आम्ही महिलांना १५०० रुपये देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विरोधकांच्या पोटात दुखायला लागले आहे. कुणी म्हणते की महिलांना विकत घेता का? कुणी म्हणत आहे की, महिलांना लाच देत का? पण या नायालयकांना बहिणीचे प्रेम समजणार नाही. बहिणीच्या प्रेमाचे मोल त्यांना समजणार नाही. १५०० रुपयांत बहिणींचे प्रेम विकत घेता येत नाही, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
आमदार रवी राणा यांनी काही दिवसांपूर्वी अमरावतीत लाडकी बहीण योजनेबाबत एक वादग्रस्त विधान केले होते. त्यांच्या या विधानानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. रवी राणा म्हणाले होते की, सरकारने महिलांना प्रतिमहिना १५०० रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, दिवाळीनंतर ही रक्कम वाढवून तीन हजार रुपये केली पाहिजे. आज सरकारने तुम्हाला १५०० रुपये दिले आहेत. उद्या तुमचा भाऊ म्हणून मी ही रक्कम तीन हजार करण्याची विनंती सरकारकडे केली, तर तुम्हाला तीन हजार मिळू शकतात. पण ते तेव्हाच शक्य होईल, जेव्हा तुम्ही मला तुमचा भाऊ म्हणून मतरुपी आशीर्वाद द्याल. पण जर तुम्ही या निवडणुकीत मला आशीर्वाद दिला नाही, तर तुमचा भाऊ म्हणून मी तुमच्या खात्यातून लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपये काढून घेईन. आमदार रवी राणा यांनी असे म्हणणे दुर्दैवी आहे. एक आमदार सरकारी योजनेचा गैरवापर निवडणुकीतील मतांसाठी करतो, असा मतितार्थ राणा यांच्या वक्तव्यातून निघतो. या विधानावरून ही योजना धोक्यात येऊ शकते.
मंत्री आदिती तटकरे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, रवी राणांनी केलेले विधान दुर्दैवी आहे. कोणत्याही लोकप्रतिनिधींनी अशा प्रकारचे विधान करणे चुकीचे आहे. महायुतीच्या सरकारने ही जी योजना आणली आहे, ती गरीब महिलांच्या सन्मानासाठी आहे. त्या महिलांकडून पैसे परत घेण्याचा असा कोणताही विचार सरकार करत नाही. जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा, हा आमचा उद्देश आहे, त्यामुळे अशा प्रकारची विधाने करून गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न कोणीही करू नये, असा इशारा मंत्री आदिती तटकरे यांनी आमदार रवी राणा यांना दिला आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant