तीन दिवसीय ‘नेक्स्ट जेन करिअर फेस्ट’ उपक्रमाचे उद्घाटन
तीन दिवसीय ‘नेक्स्ट जेन करिअर फेस्ट’ उपक्रमाचे उद्घाटन
पुणे - कला म्हणजे उर्जा निर्मिती आहे. ती सूक्ष्म, संवेदनशील असून तिच्यापर्यंत जाण्यासाठी कलाकाराकडे समर्पण भाव असण्याची नितांत आवश्यकता आहे. कलेतील मूल्ये शिकवली जात नाही तर ती संस्कारित केली जातात. शास्त्र समजावले जाते, विद्या दिली जाते, तंत्र शिकविले जाते तर कला-सौंदर्य संस्कारित केले जाते. कला आत्मसात करण्यासाठी भावना शुद्ध हवी. ज्या देशात कलेला स्थान नाही तेथे दहशतवाद फोफावताना दिसतो, अशी मार्मिक टिप्पणी तालयोगी पद्मश्री पंडित सुरेश तळवलकर यांनी केली. आजच्या काळातही गुरू-शिप्य परंपरेला अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
संवाद, पुणे, हाऊस ऑफ सक्सेस, भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस्, पुणे मॅनेजमेंट असोसिएशन आणि पुणे विद्यार्थी गृह यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नेक्स्ट जेन करिअर फेस्ट’ या उपक्रमाअंतर्गत ‘कला आणि करिअर’ या विषयावरील तीन दिवसीय प्रदर्शनी आणि मार्गदर्शन सत्रांचे शिवाजीनगरमधील बालगंधर्व कला दालन येथे आयोजन करण्यात आले असून याचे उद्घाटन आज (दि. 13) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी पंडित सुरेश तळवलकर बोलत होते.
नृत्यगुरू सुचेता चापेकर, संवाद, पुणेचे सुनील महाजन, हाऊस ऑफ सक्सेसचे प्रसाद मिरासदार, भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस्चे संचालक, प्रा. शारंगधर साठे, निकिता मोघे मंचावर होते. पुणे विद्यार्थी गृहाचे संचालक सुनील रेडेकर यांची उपस्थिती होती. नव्या शैक्षणिक धोरणाला अनुसरून सांस्कृतिक क्षेत्राशी निगडित महाराष्ट्रातील हा पहिलाच उपक्रम आहे.
कला ही कागदावर मांडता येत नाही ती गुरू-शिष्य तसेच मौखिक परंपरेतूनच प्रवाहीत होते, असे सांगून तालयोगी पंडित सुरेश तळवलकर पुढे म्हणाले, ही परंपरा जपल्यास कलाकार घडण्यास मदत होते आणि यातूनच पुढील पिढी कलेच्या क्षेत्राकडे वळते. आताचा काळ संगीत क्षेत्रासाठी उत्तम आहे. संगीत आणि नृत्य या कला वेगळ्या होऊ शकत नाही. स्वत:त रमणे हा कलेचा स्थायीभाव असतो. कला शिकताना आणि शिकविताना विचारांची बैठक महत्त्वाची असून ही आनंदासाठी करण्याची गोष्ट आहे.
उद्घाटनपर मनोगत व्यक्त करताना कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी म्हणाले, कलेच्या क्षेत्रात पारंगतता येण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन केले आहे याचा आनंद आहे. या क्षेत्रात कौशल्यासह त्यातील बारकावे जाणून घेतल्यास कलेची जोपासना करणे सोपे जाते. कला क्षेत्रात परिपूर्णता आणि अचूकता महत्त्वाची आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कला क्षेत्रातील करिअरविषयक विविध क्षेत्रे खुली होणार आहेत.
नृत्यगुरू सुचेता चापेकर म्हणाल्या, नृत्य कलेमध्ये चित्रकला, शिल्पकला, संगीत, साहित्य या सर्व कलांचे अस्तित्व आहे. तसेच शरीरशास्त्र, तंत्रज्ञान, रंगमंचाचा वापर, प्रकाशयोजना, ध्वनी योजना या तांत्रिक गोष्टी देखील नृत्य कलेशी संबंधित आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून कला आणि त्याच्याशी निगडित तंत्रांविषयी विद्यार्थ्यांना माहिती उपलब्ध होईल. कलेशी संलग्न विषयांचा विद्यापीठ स्तरावर अभ्यास होणे ही काळाची गरज आहे.
एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवी चिटणीस यांनी तंत्रशिक्षणाबरोबरच कला क्षेत्रातील शिक्षणाची आज आवश्यकता असून त्यासाठी विद्यापीठ स्तरावर प्रयत्न केले गेले पाहिजेत, असे सांगितले.
सुरुवातीस प्रास्ताविकात प्रसाद मिरासदार यांनी ‘नेक्स्ट जेन करिअर फेस्ट’ या उपक्रमाअंतर्गत आयोजित ‘कला आणि करिअर’ या उपक्रमाची माहिती विशद केली. शारंगधर साठे यांनी सूत्रसंचालन केले. आभार सुनील महाजन यांनी मानले.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
ADHARSH SWARAJ 21 AUG TO...
- 27 August, 2025
ADHARSH SWARAJ 14 AUG TO...
- 20 August, 2025
ADHARSH SWARAJ 7 AUG TO...
- 13 August, 2025
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
सेलिब्रिटी बर्थडे
गृहमंत्री अमित शाह
- जन्मदिन
- October 22
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar