जोरदार पावसामुळे रस्त्यांवर होणाऱया खड्ड्यांविरोधात बृहन्मुंबई महानगरपालिकेचे ‘स्मार्ट’ पाऊल
जोरदार पावसामुळे रस्त्यांवर होणाऱया खड्ड्यांविरोधात बृहन्मुंबई महानगरपालिकेचे ‘स्मार्ट’ पाऊल
मुंबई - जोरदार व सततच्या पावसामुळे मुंबई महानगरातील रस्त्यांवर होणाऱया खड्ड्यांची जलद गतीने दुरुस्ती करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने ‘पॉटहोल क्विकफिक्स’ मोबाईल अॅप आणि व्हॉट्स अॅप चॅटबॉट (८९९९२२८९९९) सेवा सुरू केली आहे. ‘पॉटहोल क्विकफिक्स’ मोबाईल अॅप दिनांक ९ जून २०२५ पासून नागरिकांसाठी कार्यान्वित करण्यात आला आहे. रस्त्यावरील खड्डे दुरुस्ती प्रक्रियेत नागरी सहभाग वाढविणे आणि नागरिकांना खड्डयांबाबतच्या तक्रार करण्याची प्रक्रिया सुलभ करणे, याची विशेष काळजी घेण्यात आली आहे. अॅप्लिकेशन ओपन केल्यानंतर तक्रार यशस्वीपणे नोंदविण्याची प्रक्रिया केवळ ५ पेक्षा कमी क्लीकमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.
हे अॅप अॅण्ड्रॅाईड (Android) आणि आय.ओ.एस. (iOS) या दोन्ही प्रणाली (Platform) वर उपलब्ध आहे. ‘पॉटहोल क्विकफिक्स’ हे मोबाईल अॅप वापरकर्ता स्नेही (User Friendly) आहे. या अॅपद्वारे नागरिकांना खड्ड्यांचे छायाचित्र, स्थान आणि माहिती अपलोड करून तक्रार नोंदवण्याची सोपी व जलद सुविधा प्राप्त झाली आहे. मोबाईल अॅपद्वारे करण्यात आलेली तक्रार संबंधित विभागाकडे थेट पोहोचते आणि खड्डे दुरुस्ती प्रक्रिया तातडीने सुरू होते.महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांच्या हस्ते हे अॅप दिनांक ९ जून २०२५ पासून सुरू करण्यात आले आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ते व वाहतूक विभागाने रस्तेविकासाची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेतली आहेत. त्याचप्रमाणे, पावसाळ्यात रस्त्यांवर आढळणारे खड्डे भरणे / रस्ते दुरुस्तीचे नियोजन देखील केले आहे. रस्त्यांवर आढळणारे खड्डे तसेच दुरूस्तीयोग्य रस्त्यांसाठी महानगरपालिकेच्या माहिती तंत्रज्ञान (I.T.) विभागाने ‘पॉटहोल क्विकफिक्स’ हे अॅप विकसित केले आहे. हे अॅप नागरिकांना एक सुलभ व सुसंगत डिजिटल पर्याय प्रदान करते, ज्यामध्ये खड्ड्यांचे छायाचित्र, स्थान आणि वर्णन अपलोड करून तक्रार त्वरित नोंदवता येते. नोंदवलेली तक्रार संबंधित विभाग कार्यालयाकडे स्वयंचलित पद्धतीने पोहोचते, ज्यामुळे महानगरपालिकेच्या अभियंत्यांना तात्काळ कार्यवाही करता येते. या अॅपमध्ये स्थाननिहाय तक्रार नोंदणी, छायाचित्र व स्थान टॅगिंग, तक्रारीच्या स्थितीचा मागोवा, दुरुस्तीची अपेक्षित वेळ आणि काम पूर्ण झाल्यानंतर अभिप्राय (Feedback) देण्याची सुविधा उपलब्ध आहे.
हे अॅप Android आणि iOS या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. रस्ते सुरक्षेसाठी नागरिक आणि महानगरपालिका यंत्रणा यांच्यातील संवाद अधिक सुलभ करण्यात या उपक्रमाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. महानगरपालिकेने व्हॉट्स अॅप चॅटबॉट (क्रमांक: ८९९९२२८९९९) सेवा सुरू केली आहे. याद्वारे देखील खड्ड्यांसंदर्भातील तक्रारी नोंदविता येणार आहेत. ‘Pothole’ किंवा ‘PT’ (इंग्रजीत), तसेच ‘खड्डा’ किंवा ‘ख’ (मराठीत) असे प्रमुख शब्द (Key Word) वापरून, नागरिक व्हॉट्स अॅप चॅटच्या माध्यमातून तक्रार करू शकतात. ही सेवा नागरिकांना अधिक सहजपणे तक्रार नोंदवता यावी, या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे.
एका बाजूला रस्ते विभागाच्या अभियंत्यामार्फत सक्रियपणे खड्डे शोधणे व भरण्याची प्रक्रिया परिणामकारकपणे व्हावी, यासाठी महानगरपालिका प्रशासन प्रयत्नशील आहे. त्याचबरोबर जर नागरिकांना खड्डे आढळून आल्यास त्यांनादेखील तक्रार नोंदविता यावी यासाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. खड्ड्यांसंदर्भात तक्रार आल्यानंतर ४८ तासात तक्रारीचे निवारण होणे आवश्यक आहे. जर ४८ तासात तक्रारीचे निवारण झाले नाही तर त्याबाबतचा संदेश वरिष्ठ अधिका-यांना कळविण्यात येईल. जेणेकरून वरिष्ठ अधिकारी या विषयाची दखल घेऊ शकतील. तक्रारीचे निवारण झाल्यानंतर तक्रारदाराला त्याबाबतचा संदेश (मेसेज) पाठविला जाईल व झालेल्या कार्यवाहीबाबत तक्रारदार समाधानी नसेल तर त्याला तक्रार ‘रिओपन’ करता येऊ शकेल.
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर म्हणाले की, ही संपूर्ण योजना ‘स्मार्ट मुंबई’ या व्यापक अभियानाचा भाग आहे. नागरी सेवांमध्ये पारदर्शकता आणि कार्यक्षमतेस चालना देणाऱ्या डिजिटल साधनांच्या प्रभावी वापराचे उत्तम उदाहरण आहे. नागरिकांच्या सहभागातून रस्ते अधिक सुरक्षित करण्याचे महानगरपालिकेचे उद्दिष्ट आहे. नागरिकांना महानगरपालिकेकडून चांगल्या दर्जाची सेवा मिळविण्याचा अधिकार आहे. त्यात काही त्रुटी आढळल्यास तक्रार नोंदविण्यासाठी महानगरपालिकेने अॅप आणि व्हॉट्स अॅप चॅटबॉट हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. महानगरपालिकेने जर विहित कालावधीत व परिणामकारपणे तक्रारीचे निवारण केले तर नागरिक अधिक प्रतिसाद देण्याकामी उद्युक्त होतील, याची जाणीव ठेवून ही संपूर्ण प्रक्रिया राबविण्यात येत असल्याचे श्री. बांगर यांनी नमूद केले.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
ADHARSH SWARAJ 21 AUG TO...
- 27 August, 2025
ADHARSH SWARAJ 14 AUG TO...
- 20 August, 2025
ADHARSH SWARAJ 7 AUG TO...
- 13 August, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar