Breaking News
आशा पारेख आणि शिवाजी साटम यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर
मुंबई - महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या स्व.राज कपूर जीवनगौरव पुरस्कार २०२३ करिता जेष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांची तर चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार २०२३ करिता जेष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांची निवड करण्यात आली आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज ही घोषणा केली.
स्व.राज कपूर जीवनगौरव पुरस्कार २०२३ करिता जेष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांची निवड करण्यात आली आहे. रु.10 लक्ष, मानपत्र आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. तर स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार २०२३ करिता ज्येष्ठ लेखक, दिग्दर्शक संकलक एन.चंद्रा यांची निवड करण्यात आली आहे. रु.६ लक्ष, मानपत्र आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार २०२३ करिता जेष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांची निवड करण्यात आली आहे. रु.10 लक्ष, मानपत्र आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. तर चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार २०२३ करिता लेखक, दिग्दर्शक तसेच अभिनेता दिग्पाल लांजेकर यांची निवड करण्यात आली आहे. रु. ६ लक्ष, मानपत्र आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
या सर्वांचे अभिनंदन करतांना मुनगंटीवार यांनी म्हटले आहे की राज्याचेच नव्हे तर देशाचे सांस्कृतिक क्षेत्र समृद्ध करणाऱ्या या कलाकारांचा आम्हाला अभिमान आहे. त्यांना पुरस्कार जाहीर करतांना मनापासून आनंद होत आहे. हे सर्वजण सांस्कृतिक क्षेत्राचा गौरव अधिकाधिक उंचावत राहतील असा आम्हाला विश्वास आहे.
हे पुरस्कार राज्याचे मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री तसेच सांस्कृतिक कार्य मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बुधवार २१ ऑगस्ट २०२४ रोजी, सायंकाळी ७ वाजता, NSCI डोम, वरळी मुंबई येथे समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी दिली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant