Breaking News
विधानपरिषदेची प्रतिष्ठेची लढाई
राज्यातील विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी दि.१२ जुलै रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी १२ उमेदवार रिंगणात असणार आहेत. महाविकास आघाडीकडून तीन उमेदवार दिल्याने आता ही निवडणूक होणे गरजेचे आहे. महाविकास आघाडी किंवा महायुती या दोन्हीसमोर मतांची जुळवाजुळव करून आपल्या उमेदवारांना निवडून आणण्याचे आव्हान दोहोंकडच्या वरिष्ठ नेत्यांसमोर असणार आहे. महाविकास आघाडीला आपला तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी चार किंवा जास्त मतांची गरज भासणार आहे असे दिसते. तर महायुतीला आपला नववा उमेदवार निवडून आणण्यासाठी सहा मतांची गरज भासणार आहे. या मतांची जुळवाजवळ नेमकी कअशी होणार ? यात अपक्ष आमदारांचे महत्व किती ? कोण पडद्याआडून मतदान करणार, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यात नुकत्याच फुटलेल्या पक्षातील आमदार कुणाच्या बाजूने निर्णय घेणार, याचीही चर्चा सुरू झाली आहे.
विधानपरिषदेची निवडणूक १२ जुलै म्हणजे काही दिवसांवर आली आहे. त्यादृष्टीने राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध होईल अशी स्थिती होती. मात्र शेवटच्या दोन दिवसांमध्ये महाविकास आघाडीने तिसरा उमेदवार दिला आणि या निवडणुकीत महायुतीसमोर आव्हान निर्माण केले. त्यामुळे निवडणुकीतील रंगत वाढली आहे. महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसच्या प्रज्ञा सातव, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शेकापचे जयंत पाटील आणि अचानकरित्या शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांची उमेदवारी दाखल झाली. त्यामुळे महाविकास आघाडीला तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. महाविकास आघाडीसमोर आव्हान आहे तसेच महायुतीसमोर आव्हान उभे राहिले आहे.
विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी २३ मतांचा कोटा आहे. विधानसभेत महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये कोणाची किती ताकद असेल आणि अकरावी जागा निवडून आणण्यासाठी मतांची जुळवाजुळव कशी करावी लागणार याची चाचपणी दोन्ही बाजूनी सुरू आहे. महाविकास आघाडीपेक्षा दुपाटीहून अधिक आमदारांचे संख्याबळ महायुतीकडे आहे, असे चित्र दिसते. परंतु निवडणुकीच्या मतदानावेळी नेमके कोण कुणाकडे जाणार, कुणाला मत देणार, त्यावेळची राजकीय गणिते नेमकीवकाय असणार यावर अकराव्या जागेचे भवितव्य अवलंबून आहे.
महाविकास आघाडीमध्ये महत्वाचे राजकीय पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट यांचा समावेश आहे.
तसेच बहुजन विकास आघाडी, समाजवादी पक्ष, एमआयएम, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, शेतकरी कामगार पक्ष हे महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहेत. यापैकी राष्ट्रवादी शरद पवार -१२, उद्धव ठाकरे शिवसेना - १५ + १ शंकरराव गडाख = १६, काँग्रेस - ३७ असे मिळून एकूण - ६५ तर बहुजन विकास आघाडी - ३, समाजवादी पक्ष - २, एमआयएम - २, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी - १, शेतकरी कामगार पक्ष -१ असे एकूण ९ घटक पक्ष असे संख्याबळ आहे. महाविकास आघाडीला पाठिंबा देणारे पक्ष लक्षात घेऊन एकूण आमदार ७१ आमदार महाविकास आघाडीकडे आहेत. तरीही महाविकास आघाडीला मतांची जुळवाजुळव करण्यासाठी चार किंवा त्यापेक्षा अधिक मतांची गरज पडणार, असे दिसते.
महायुतीमध्ये भाजपा, राष्ट्रवादी (अजित पवार गट ), शिवसेना (शिंदे गट) प्रामुख्याने हे तीन राजकीय पक्ष आहेत. यात
राष्ट्रवादी (अजित पवार) - ४१, भाजपा - १०३, शिवसेना शिंदे गट - ३८ असे संख्याबळ आहे. तसेच महायुतीला देवेंद्र भुयार, संजयमामा शिंदे या राष्ट्रवादी (अजित पवार) गटाला मानणारे आमदार पाठींबा देण्याची शक्यता आहे. असे अजित पवार राष्ट्रवादीचे एकूण ४३ आमदार महायुतीला पाठींबा देतील. तसेच भाजपला
रवी राणा, महेश बालदी, विनोद अग्रवाल,प्रकाश आवाडे, राजेंद्र राऊत, विनय कोरे, रत्नाकर गुट्टे हे आमदार पाठिंबा देणार आहेत, असा अंदाज आहे. भाजप व मित्र पक्ष आणि अपक्ष असे मिळून ११० आमदार आहेत. तसेच एकनाथ शिंदे शिवसेना गट - ३८, त्यांना नरेंद्र भोंडेकर, किशोर जोरगेवार, लता सोनवणे, बच्चू कडू, राजकुमार पटेल, गीता जैन, आशीष जैसवाल, मंजुळा गावीत, चंद्रकांत निंबा पाटील, राजू पाटील या १० आमदारांचा पाठिंबा आहे. महायुतीला अशा एकूण २१० आमदारांचा पाठींबा आहे. महायुतीला आपले नऊ उमेदवार निवडून आणण्यासाठी आणखी सहा मतांची गरज भासणार आहे. त्यामुळे अपक्ष आमदारांवर महायुतीची मदार अवलंबून असणार आहे.
विधान परिषदेच्या जागा ११ तर १२ जण या निवडणुकीसाठी इच्छुक असल्याने एका उमेदवाराचा पराभव निश्चित आहे. पण हा उमेदवार महाविकास आघाडी की महायुतीचा हे निकालादिवशीच समजेल. तसेच सध्या दोन्हीकडून मोठी खलबते सुरू असून या निवडणुकीत कोण बाजी मारेल, हे राजकीय व्यूहरचनेवर अवलंबून आहे. आता या निवडणुकीतील विजयश्री खेचून आणण्याची मदार सर्वस्वी अपक्ष उमेदवारांवर अवलंबून आहे. या निवडणुकीत क्रॉस वोटिंगही महत्वाचे व निर्णयात्मक ठरणार आहे. विधानासपरिषदेच्या या निवडणुकीत घोडेबाजार होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. आघाडी आणि युतीसाठी ही प्रतिष्ठेची लढाई असणार आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
BIPIN ADHANGLE